जहाल भूपतीसह 60 नक्षलवाद्यांची शरणागती, माओवाद 100 टक्के संपणार : मुख्यमंत्री

Foto

भूपतीच्या शिरावर होते 10 कोटींहून अधिकचे बक्षीस

गडचिरोली : नक्षलवादी चळवळ देशात अखेरच्या घटका मोजत असतानाच महाराष्ट्रात या चळवळीला जोर का धक्का बसला. जहाल भूपती या नेत्यासह 60 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. हे सर्व नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. त्यांनी शस्त्र खाली ठेवली आणि संविधान हाती घेतले आहे. विकासाचा मार्ग हा बंदुकीच्या धाकावर खुला होत नाही तर लोकशाहीतून वृद्धींगत होतो हे त्यांनी मान्य केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षली चळवळीचा इतिहास सांगतानाच पुढील ॲक्शन प्लान ही सांगितला.

माओवाद संपूर्णपणे संपुष्टात आणण्याची सुरुवात गडचिरोली महाराष्ट्राने केली, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भूपती यांचे आत्मसमर्पण झाले आहे. भूपती यांचे आत्मसमर्पण अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माओवादाबाबत घेतलेली भूमिका आणि आखलेल्या योजना याचा परिपाक म्हणून आताच्या घडीला देशातून मोठ्या प्रमाणात माओवादाचे उच्चाटन आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावती भागातील दंडकारण्यात गेली अनेक वर्षे नक्षलवादी चळवळीचा चेहरा राहिलेला वरिष्ठ नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू अखेर भामरागड येथे गडचिरोलीपोलिसांसमोर शरण आला. यानंतर आज (15 ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शस्त्रे खाली ठेवून भूपती यांनी संविधान हाती घेतले. यावेळी भूपती यांच्यासह त्यांच्या तब्बल 60 सहकाऱ्यांनी आत्मसमर्पण केले. 

आता माओवाद्यांसमोर केवळ दोनच पर्याय, एकतर...

गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एक योजना आखली गेली. यामध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास हा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करत आहेत, त्यांच्यासमोर दोनच पर्याय राहिले पाहिजेत, ते म्हणजे एक तर शस्त्र सोडून त्यांनी मुख्य व्यवस्थेत यायचे किंवा दुसरे म्हणजे पोलीस कारवाईला सामोरे जायचे. तसेच गेल्या काही वर्षांत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील माओवादाला हद्दपार करण्याच्या संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात एक योजना आखली. त्याच योजनेच्या अंतर्गत आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात देशातून माओवादाचे उच्चाटन होत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात माओवादी आत्मसमर्पण 

सुरुवातीच्या काळात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हा सगळा भाग नक्षलग्रस्त होता. त्यातही गडचिरोली हा दंडकारण्यशी जोडला गेलेला आहे आणि हा सगळा मोठा भाग विकासापासून वंचित राहिला. युवकांच्या डोक्यात माओवादी विचार पेरले गेले. परंतु, त्यांना आता समजले आहे की, जी स्वप्ने दाखवली होती, ती सत्यात येणार नाहीत. गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात माओवादी आत्मसमर्पण करत आहेत. गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन आहे. माओवाद उच्चाटनसाठीच्या मोहिमेचे नेतृत्व केले. मोठी ऑपरेशन या भागात राबवली. जहाल आणि वरिष्ठ केडर यांना नेस्तनाबूत करण्याचे काम केले. विकासकामांच्या माध्यमातून आपण नवीन भरती बंद केली, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

आता पोलीस गडचिरोलीला बदली मागून घेतात

काही वर्षांपूर्वीपर्यंत पोलिसांना जणू काही शिक्षा केल्यासारखे गडचिरोलीला बदली करण्याचा इशारा दिला जात असे. गडचिरोली म्हणजे अतिशय भयंकर भाग असा त्याची प्रतिमा होती. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. आता गडचिरोलीला बदली करा, अशी विनंती आम्हाला करण्यात येते. इतक्या मोठ्या प्रमाणात या भागात बदल झाला आहे. गडचिरोलीत एक नवीन इतिहास आज लिहिला गेला आहे. भूपतीसारख्या वरिष्ठ, सुशिक्षित, हुशार तसेच प्रशिक्षित आणि एक प्रकारची ठाम वैचारिक भूमिका असलेल्या, ज्यांनी एक संपूर्ण चळवळ उभी केली, अशा व्यक्तीने आत्मसमर्पण करणे तसेच त्यांच्यासह त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी आत्मसमर्पण करणे ही देशातील एक मोठी गोष्ट आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

माओवाद 100 टक्के हद्दपार होणार

उत्तर गडचिरोली भागातून माओवाद संपुष्टात आणला होता. आता उर्वरित भागातून माओवाद संपवण्याचे काम सुरू आहे. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके लोक आता शिल्लक राहिलेले आहेत. मी त्यांनाही आवाहन करतो की, त्यांनीही आता तत्काळ मुख्य धारेत यावे. आत्मसमर्पण करावे. आम्ही त्यांचेही स्वागत करू. अन्यथा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. या ठिकाणी माओवाद 100 टक्के हद्दपार होणार, अशा प्रकारच्या परिस्थितीपर्यंत आपण पोहोचत आहोत. या लढाईचे नेतृत्व गडचिरोली करत आहेत. गेल्या महिनाभर सातत्याने भूपतीकडून आपल्या दलांशी वाटाघाटी सुरू होत्या. त्यांच्या मनातही आता अशा प्रकारची भावना तयार झाली आहे की, असे वैचारिक युद्ध आपण हरलो आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. तसेच या सर्वांना मुख्य धारेत सामावून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली. 

दरम्यान, 10 कोटींहून अधिकचे बक्षीस माओवादी भूपतीच्या शिरावर आहे. तो महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आदी राज्यांत मोस्ट वॉण्टेड होता. जानेवारी 2025 मध्ये भूपतीची पत्नी व केंद्रीय समिती सदस्य विमला सिडाम ऊर्फ तारक्काने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर अनेक जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करत शस्त्र सोडून हाती संविधान घेतले. भूपतीने 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले.